बेळगाव :बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पाहणी केली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.
या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्था झाली होती. खड्डे, खराब रस्ता आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी १० जून रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन समस्या मांडली होती.
निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी १५ जून रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी पाठविले. पाहणीदरम्यान रस्त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे सांगितले.
पाहणीवेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी केवळ तात्पुरती डागडुजी न करता पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कायमस्वरूपी सुधारणा करण्याची मागणी केली.
या मार्गावर दररोज हजारो नागरिक, रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि इतर वाहनांची ये-जा असते. त्यामुळे रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
महापालिका प्रशासनाने या सार्वजनिक समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
