सद्गुरू श्री वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेतर्फे यंदाचा गुरुपौर्णिमा महोत्सव रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज परिसर) येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला बेळगावसह गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि परिसरातील मोठ्या संख्येने नामधारक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने आणि संगीत जीवनविद्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर बालनृत्य, गुरुपूजन, मानसपूजा, मान्यवरांचा सत्कार तसेच विविध आध्यात्मिक उपक्रम पार पडणार आहेत.
यावेळी सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै हे प्रमुख उपस्थित राहून उपस्थितांना जीवनमूल्ये, अध्यात्म आणि सकारात्मक जीवनदृष्टी यावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर अनुग्रह आणि महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रल्हाद वामनराव पै हे बेळगाव दौऱ्यावर तीन दिवस राहणार असून, गुरुपौर्णिमा कार्यक्रमानंतर मराठा मंडळ पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी "यशस्वी व्हा" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देणार आहेत.
या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जीवनविद्या मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या उपक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत प्रबोधनकार शंकरराव बांधकर यांनी माहिती दिली. यावेळी शाखाध्यक्ष शैलेश शिरोडकर, दीपक बिर्जे, सतीश बेकवाडकर आणि तानाजी पाटील उपस्थित होते.









