बेळगाव : शहर आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू असून, या कामांच्या प्रगतीचा आढावा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी घेतला. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पावसामुळे तसेच अन्य कारणांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची पाहणी करत हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
सह्याद्रीनगर, कुवेंपूनगरमध्ये कामांची पाहणी
सह्याद्रीनगर आणि कुवेंपूनगर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सुरू असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दुरुस्ती करताना दर्जेदार साहित्याचा वापर करावा आणि केलेले काम दीर्घकाळ टिकेल, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर रामनगर, ज्योतीनगर, जयनगर, मुस्तफा कॉलनी, शाहूनगर बसस्थानक आणि कलमेश्वरनगर परिसरातील रस्त्यांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यांसह वसाहतींमधील अंतर्गत मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजवावेत. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, अशी कडक सूचना आमदार हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
शहरातील प्रमुख मार्ग, विविध वसाहतींना जोडणारे रस्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या मार्गांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याच्या दर्जाची पाहणी करावी आणि आवश्यकता भासल्यास तातडीने पुढील दुरुस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळावी आणि शहरातील मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, यासाठी रस्ते दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण केली जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणीवेळी बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम., प्रभाग क्रमांक ३१च्या नगरसेविका वीणा विजापूरे, सहाय्यक अभियंता जगदीश एस., कनिष्ठ अभियंता अक्षता यांच्यासह महापालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

