बेंगळुरू : माजी मंत्री जमीर अहमद यांच्या समर्थनार्थ मंत्री सतीश जारकिहोळी यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. जमीर यांनी केलेल्या कथित चुकीबाबत बोलताना, “अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. फक्त आताच पहिल्यांदाच असे झाले आहे, असे म्हणता येणार नाही,” असे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, यापूर्वीही काही नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे एका घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जमीर अहमद यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत सतीश जारकिहोळी म्हणाले की, “अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा हा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे.”
दरम्यान, बेळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात काँग्रेसचे मोठ्या संख्येने आमदार असून, प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिला प्रतिनिधित्वालाही संधी दिली तर चांगले होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि माजी खासदार डी.के. सुरेश यांच्या भेटीबाबत बोलताना जारकिहोळी यांनी ही नियमित चर्चा असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रश्न, विभागीय कामकाज आणि पक्ष संघटन यावर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. न्यायालयीन प्रक्रियेसाठी सरकारकडून योग्य तयारी सुरू असून, सरकारच्या बाजूने प्रभावीपणे बाजू मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
