शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, उद्यमबाग पोलिसांनी गांजा मिश्रित अमली पदार्थाच्या चॉकलेट पॅकेट्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 किलो 858 ग्रॅम वजनाची 27 चॉकलेट पॅकेट्स जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट 2026 रोजी उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत के.एल.ई. इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यालगत एक व्यक्ती गांजा मिश्रित अमली पदार्थाच्या चॉकलेट पॅकेट्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे खडेमार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत भोलू पिता जित्ताल प्रजापती (वय 39), सध्या रा. हनुमान नगर, बेळगाव, मूळ रा. चम्रूपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 54 हजार रुपये किमतीचे 6 किलो 858 ग्रॅम वजनाचे गांजा मिश्रित अमली पदार्थाचे 27 चॉकलेट पॅकेट्स जप्त केले. याशिवाय 10 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, 600 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 30 हजार रुपये किमतीची स्कूटी असा एकूण 94 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 77/2026 नोंदवण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी, पीएसआय प्रविण बिरादर, पीएसआय यू. बी. कट्टीकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त, डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) आणि डीसीपी (गुन्हे) यांनी कौतुक केले.









