बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप उत्तर बेळगावचे काँग्रेस आमदार आसिफ सेठ यांनी केला आहे. विरोधकांकडून मांडली जाणारी ‘वॉशिंग मशिन थिअरी’ सतीश जारकीहोळी यांच्यावर लागू होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आसिफ सेठ यांनी सतीश जारकीहोळी हे केवळ बेळगावपुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील महत्त्वाचे नेते आणि उद्योगपती असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात; मात्र अशा दबावाला सामोरे जाण्याची क्षमता जारकीहोळी यांच्यात असल्याचे त्यांनी म्हटले.
जारकीहोळी यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत बोलताना सेठ यांनी, मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या जारकीहोळी यांच्याकडे सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा केला. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे त्यांनी सूचित केले.
काँग्रेस सरकार स्थिर असल्याचा दावा
दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांवरही आसिफ सेठ यांनी भाष्य केले. काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नसून राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील काँग्रेस सरकार एकजुटीने काम करत आहे, असे सेठ यांनी स्पष्ट केले.
सतीश जारकीहोळी यांच्यावरील कारवाईचा मुद्दा आणि काँग्रेसमधील कथित अंतर्गत मतभेद यावरून सध्या राजकीय वातावरण तापले असताना, आसिफ सेठ यांच्या या वक्तव्यामुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी उधाण आले आहे.

