शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगावात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. कोरे यांनी KLE संस्थेच्या 110 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेत संस्थेच्या संस्थापक ‘सप्तर्षी’ंच्या दूरदृष्टी, त्याग आणि समाजसेवेच्या भावनेचे स्मरण केले.
संस्था सुरू झाली तेव्हा आर्थिक साधने, स्वतःची इमारत किंवा आवश्यक सुविधा नव्हत्या. मात्र, ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थापकांचा दृढ संकल्प हीच संस्थेची खरी ताकद होती, असे त्यांनी सांगितले.
आज KLE संस्था शेकडो शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि संशोधन केंद्रांद्वारे देश-विदेशात कार्यरत आहे. हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी आणि समाजाच्या सहकार्याचे फलित असल्याचे डॉ. कोरे यांनी नमूद केले.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अविनाश पोतदार आणि शिरीष गोगटे यांनी डॉ. कोरे यांच्या नेतृत्वगुणांचे, शिस्तप्रिय कार्यपद्धतीचे आणि समाजाभिमुख दृष्टीकोनाचे कौतुक केले. "फुलांचा सुगंध एका दिशेने पसरतो; पण चांगल्या व्यक्तीच्या कार्याचा सुगंध सर्वदूर दरवळतो. डॉ. प्रभाकर कोरे हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत," अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
