बेळगाव :
शहीदों के सरताज म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे पाचवे गुरु श्री गुरु अर्जुन देव जी महाराज यांच्या शहीदी दिवसानिमित्त बेळगावातील गोवा वेस टीलकवाडी येथील साध संगत गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळपासून गुरुद्वारा परिसरात गुरवाणी शब्द कीर्तन, प्रार्थना आणि गुरुजींच्या जीवनकार्यावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुरु अर्जुन देव जी यांनी धर्म, मानवता आणि सत्याच्या मार्गासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
इतिहासात १६०६ साली मुघल बादशहा जहांगीरच्या काळात गुरु अर्जुन देव जी यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. धर्म बदलण्याचा दबाव असूनही त्यांनी आपल्या श्रद्धा आणि तत्त्वांशी तडजोड केली नाही. अखेर त्यांनी मानवता व धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
शहीदी दिवसाच्या स्मरणार्थ गोवा सर्कल परिसरात थंड्या शरबताचे वाटप करण्यात आले. या सेवेत सुमारे ५ हजार श्रद्धाळूंनी सहभाग घेत प्रसाद स्वीकारला आणि गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली.
या सेवाकार्यात साध संगत गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे पदाधिकारी, सिंधी समाजातील सेवेकरी, सिखलिगर समाजातील सेवेकरी तसेच कर्नाटकातील शीख समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
यावेळी कर्नाटक सिख समाजाचे राज्याध्यक्ष ओंकार सिंह भाटिया यांनी उपस्थित श्रद्धाळू व सेवेकऱ्यांचे आभार मानत गुरु अर्जुन देव जी यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले.
