बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात यंदाच्या पावसाचे असमान चित्र पाहायला मिळत आहे. काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत असताना, तर काही गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुडलगी तालुक्यातील मुन्याळ गावात पावसासाठी एक अनोखा आणि पारंपरिक उपक्रम राबविण्यात आला.
गावातील नागरिकांनी गाढवांचा पारंपरिक हिंदू विवाहसोहळा आयोजित केला. विशेष म्हणजे या विवाहासाठी स्वतंत्र लग्नपत्रिकाही छापण्यात आली होती. वराला 'कांतेश' तर वधूला 'कस्तुरी' अशी नावे देण्यात आली.
विवाहावेळी दोन्ही गाढवांना बाशिंग बांधण्यात आले. मंगलाष्टकांच्या गजरात शुभमुहूर्तावर अक्षता टाकून विवाह लावण्यात आला. त्यानंतर सप्तपदीसह सर्व धार्मिक विधी पार पडले. विवाहानंतर संपूर्ण गावासाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले.
मुन्याळ गावाजवळून वाहणाऱ्या घटप्रभा नदीत पाणी असले तरी गाव परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत असून, पारंपरिक श्रद्धेनुसार हा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, 'कांतेश' आणि 'कस्तुरी' यांच्या या आगळ्यावेगळ्या विवाहाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
