कॅम्प विभागातील माध्यमिक शाळांच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. सेंट पॉल शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
कॅन्टोन्मेंट उर्दू हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विभागीय स्पर्धेत सुरुवातीपासूनच सेंट्रल हायस्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या चपळ हालचाली, अचूक सर्व्हिस आणि प्रभावी स्मॅशला क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सेंट्रल हायस्कूलचा पहिला सामना वनिता विद्यालय इंग्लिश मीडियमच्या संघाविरुद्ध झाला. या सामन्यात सेंट्रल हायस्कूलच्या खेळाडूंनी 15 गुणांची आघाडी घेत विजय नोंदवला.
त्यानंतर मराठी विद्यानिकेतनच्या संघाशी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही सेंट्रल हायस्कूलने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत 15 गुणांनी सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
अंतिम सामन्यात सेंट अँथोनी कन्नड माध्यम शाळेच्या संघाशी सेंट्रल हायस्कूलची लढत झाली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेंट्रल हायस्कूलच्या खेळाडूंनी संयमी आणि नियोजनबद्ध खेळ करत पाच गुणांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह संघाने स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या खेळाडूंची तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला कॅन्टोन्मेंट उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच कॅम्प झोनमधील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सेंट्रल हायस्कूलच्या विजयी संघाला मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नागराजू, मुख्याध्यापक बी. एम. पाटील आणि क्रीडा शिक्षक के. वाय. हैबत्ती यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, या यशाबद्दल शाळेच्या वतीनेही विजेत्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.









