बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नासंदर्भात भेट घेण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोलनाक्यावर अडवल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ काही वाहनांमधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र हत्तरगी टोल परिसरात पोलिसांनी त्यांचा ताफा थांबवला.
या कारवाईनंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून आंदोलन सुरू केले. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला.
सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून बेळगाव प्रशासनाला सूचना देण्यात आल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारवाईचा लेखी आदेश दाखवण्याची मागणी समितीचे नेते आणि वकील अमर येळ्ळूरकर यांनी केली असता पोलिसांकडून तो उपलब्ध करून देण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला.
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूर येथे भेट घेणार होते. यासाठी कोल्हापूर प्रशासनाकडे वेळ मागण्यात आली होती.
तसेच दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या माध्यमातूनही भेटीबाबत प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
दरम्यान, कार्यकर्त्यांना मार्गातच रोखण्यात आल्याने दोन्ही राज्यांच्या प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली असून, हत्तरगी टोलनाक्यावर आंदोलन सुरूच आहे.
