बेळगावी, दि. 16 सप्टेंबर 2026 :
उद्योजकता, व्यवस्थापन शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत KLS Institute of Management Education and Research (KLS IMER) चा 36वा स्थापना दिन बुधवारी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने झाली. KLS IMER गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष उदय कालकुंद्रिकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रावसाहेब बी. एम. गोगटे यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्थापना दिनानिमित्त बेळगावी येथील J. D. Group चे व्यवस्थापकीय संचालक जे. डी. देसाई यांचा परिचय विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून करून दिला. त्यानंतर त्यांना ‘Entrepreneur of the Year – 2026’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
KLS IMER चे सहाय्यक प्राध्यापक तथा स्थापना दिन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुमंत देसाई यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सत्कार स्वीकारल्यानंतर जे. डी. देसाई यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील विविध टप्पे विद्यार्थ्यांसमोर मांडले. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातील अडचणी, संघर्ष आणि त्यातून उभ्या राहिलेल्या J. D. Group च्या विकासाचा त्यांनी आढावा घेतला. सुमारे ₹100 कोटींच्या उलाढालीपर्यंत झालेल्या व्यवसायाच्या वाटचालीचे अनुभव त्यांनी शेअर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, टाटा समूहाचे माजी ब्रँड कस्टोडियन आणि लेखक हरीश भट्ट यांनी व्यवसायाकडे केवळ नफा मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता समाजाप्रती असलेल्या जबाबदारीच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले.
“कामगार आणि समाजाच्या कल्याणावर समृद्धीचा पाया रचला जातो,” असे सांगत भट्ट यांनी औद्योगिक प्रगतीमध्ये कामगार कल्याणाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यवसायाचा उद्देश व्यापक आणि समाजोपयोगी असेल, तर तो राष्ट्रनिर्मितीतही योगदान देऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जमशेटजी टाटा यांच्या कार्याचा संदर्भ देत कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अपघात विमा, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांच्या माध्यमातून कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला महत्त्व देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. भारताच्या औद्योगिक विकासात आणि पोलाद उद्योगाच्या उभारणीत जमशेटजी टाटा यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
हरीश भट्ट यांनी स्वामी विवेकानंद आणि जमशेटजी टाटा यांच्या ऐतिहासिक भेटीचा संदर्भ देत भारतात वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याच्या विचारावर झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. या विचारप्रवाहातून पुढे बंगळुरू येथील Indian Institute of Science (IISc) च्या स्थापनेला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द कर्नाटक लॉ सोसायटी, बेळगावीचे उपाध्यक्ष राम भंडारे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. KLS IMER चे प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार पारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी KLS Board of Management चे अध्यक्ष A. K. तगारे, KLS चे सचिव S. V. गणाचारी आणि KLS IMER चे संचालक डॉ. आरिफ शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

