बेळगाव :शिवम असोसिएट्स कंपनीशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी शिवानंद नीलण्णावर यांना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर सोमवारी रात्री हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली.
या प्रकरणात माळमारुती पोलिसांनी १५ मे रोजी शिवानंद नीलण्णावर यांना अटक केली होती. त्यानंतर तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्यात आली होती.
बेंगळुरू येथील ९२ व्या सिटी सिव्हिल अँड सेशन्स न्यायालयाने १२ जून रोजी अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांची कारागृहातून सुटका झाली.
कारागृहाबाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवानंद नीलण्णावर यांनी, “ॐ नमः शिवाय… सर्वांचे चांगले व्हावे अशी माझी इच्छा आहे. यापेक्षा अधिक काही बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार २७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तीन लाख रुपयांच्या बाँडसह जामीनदार देणे, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटींवर अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
दरम्यान, जामीन मिळाला असला तरी सीआयडीकडून सुरू असलेला तपास पुढेही सुरू राहणार आहे.
