अनैतिक संबंधांना पतीकडून विरोध होत असल्याच्या कारणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना निपाणी तालुक्यातील खडकलाट येथे समोर आली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या हत्येचा छडा तब्बल साडेपाच महिन्यांनंतर लागला आहे. या प्रकरणामुळे खडकलाट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राघू सिद्धाप्पा गावडे (वय ४०, रा. खडकलाट) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खडकलाट पोलिसांनी त्यांची पत्नी भंगारी राघू गावडे (वय ३२) आणि तिचा कथित प्रियकर रामा मायाप्पा राणगे (वय ४०, रा. बेनाडी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राघू गावडे यांना पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांची माहिती झाली होती. या संबंधांना त्यांनी विरोध केल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने संगनमत केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
फेब्रुवारी महिन्यात राघू गावडे यांचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे बराच काळ या घटनेची माहिती बाहेर आली नाही.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संशयाच्या आधारे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराची चौकशी केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला.
तब्बल साडेपाच महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्येचे गूढ उकलल्याने खडकलाटसह निपाणी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकलाट पोलीस करत आहेत.









