आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कोडिंगचे ज्ञान मिळावे या उद्देशाने शाहापूर येथील चिंतामणराव सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना AI व कोडिंग विषयावरील पुस्तके मोफत वितरित करण्यात आली. हा उपक्रम आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्या वतीने राबविण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग ही भविष्यातील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त क्षेत्रे असल्याचे सांगण्यात आले. बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष नागराज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना AI आणि कोडिंग विषयावरील पुस्तके वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला भाजप बेळगाव महानगर जिल्ह्याच्या गीता सुतार, मुख्याध्यापिका लक्ष्मी नायक, दत्तांशच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना सारंग, रेखा गुरवगोळ, लिंगराज पाटील, अनिल कोरे, महांतेश नंदीहाळी, देवेंद्र यादव, मंजुनाथ हंचिनमणी, महेश तसेच शाळेचे शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देत डिजिटल ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने चाणक्य एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.
