डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करावा, या उद्देशाने हिंदवाडी येथील के.एल.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (KLS IMER) यांनी आयोजित केलेला 'ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी डिजिटल सक्षमीकरण' हा 15 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या बॅचला सहभागींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बेळगाव शहरातील विविध भागांतील ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेत डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि प्रभावी वापर शिकून घेतला. दैनंदिन जीवनातील ऑनलाइन व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यावर या अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान ऑनलाइन सुरक्षितता, सायबर फसवणूक टाळण्याचे उपाय, मोबाईल अॅप्सचा प्रभावी वापर, UPI व्यवहार, सोशल मीडियाद्वारे संवाद, शासकीय सेवा ऑनलाइन मिळविण्याच्या प्रक्रिया, लघु ऑनलाइन व्यवसायाची सुरुवात तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने डिजिटल जाहिराती तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा प्रत्यक्ष वापर करून सहभागींचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.
संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत, प्रात्यक्षिकांसह आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून राबविण्यात आला. त्यामुळे अनेक सहभागी आता डिजिटल व्यवहार स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे करण्यास सक्षम झाले आहेत.
या उपक्रमाचे नियोजन व समन्वय संस्थेचे संचालक डॉ. आरिफ शेख यांनी केले, तर प्रशिक्षणाची जबाबदारी सौ. अनुप्रिया कणबारकर यांनी प्रभावीपणे पार पाडली.
या अभ्यासक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे KLS IMERतर्फे लवकरच पुढील बॅच सुरू करण्यात येणार असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









