बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने पंत बाळेकुंद्री येथील पंतनगर विद्युत केंद्रासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मोर्चा काढला आणि काही काळ रस्ता रोको आंदोलन केले.
ग्रामीण भागात वारंवार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सकाळी, रात्री तसेच दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत वीज बंद राहत असून, २४ तासांच्या कालावधीत तब्बल ७ ते ८ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरीही वीज समस्येने त्रस्त
पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीला पाणी देण्यासाठी वीज आवश्यक असताना पुरेसा आणि नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांवर ₹२२ हजार भरण्याचा दबाव?
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून ग्रामीण भागातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सजावट व धार्मिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत जोडणीसाठी ₹२२ हजार रुपये भरण्याचा दबाव हेस्कॉमकडून आणला जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या मुद्द्यामुळे गणेशभक्तांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
समस्या न सुटल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
रस्ता रोकोमुळे पंत बाळेकुंद्री परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी हेस्कॉमच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
माजी आमदार संजय पाटील, माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव आणि मंडळ अध्यक्ष युवराज जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील वीज समस्या कायम राहिल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, मारिहाळ पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनानंतर हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. वीजपुरवठा आणि संबंधित तक्रारींची दखल घेऊन समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या आंदोलनात भाजप पूर्व भागातील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

