नवी दिल्ली | डी मीडिया
देशातील मद्य उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई करत काही नामांकित मद्य ब्रँडच्या निवडक प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासादरम्यान काही उत्पादकांनी नैसर्गिक प्रक्रियेऐवजी कृत्रिम फ्लेवरचा वापर करून उत्पादने तयार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काही उत्पादकांनी न्यूट्रल स्पिरिट किंवा न्यूट्रल अल्कोहोलमध्ये बाहेरून फ्लेवर मिसळून ते उत्पादन रम किंवा व्हिस्की म्हणून बाजारात विकले. मात्र अशा उत्पादनांवर "Rum-flavoured Spirit" किंवा "Whisky-flavoured Spirit" असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असतानाही तो करण्यात आला नव्हता.
तपासासाठी विविध कंपन्यांच्या रम आणि व्हिस्कीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात कृत्रिम फ्लेवरमुळे मूळ नैसर्गिक चव झाकली जात असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे ही उत्पादने नियमांनुसार दर्जाहीन ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तपासादरम्यान Old Monk XXX Rum च्या "7 Years Old Blended" या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या मिश्रणामध्ये परिपक्व रमचे प्रमाण अत्यल्प असून मुख्य घटक न्यूट्रल स्पिरिट असल्याचे तपासात आढळले. त्यामुळे 2018 च्या Food Safety and Standards (Alcoholic Beverages) Regulations मधील वयोमर्यादा दर्शविणाऱ्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
या निष्कर्षानंतर मोहान रॉकी स्प्रिंगवॉटरच्या खोपोली येथील युनिटमध्ये तयार होणाऱ्या Old Monk The Legend, Old Monk Gold Reserve आणि Old Monk XXX Matured Rum यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय बारामती येथील United Spirits निर्मित McDowell's No.1 Rum वरही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच मध्य प्रदेशातील INBREW Beverages निर्मित Bagpiper Deluxe Whisky आणि Old Cask Deluxe XXX Rum, Associated Alcohol & Breweries निर्मित Central Province Whisky आणि McDowell's No.1 Celebration Matured XXX Rum, तसेच United Spirits निर्मित Antiquity Blue Whisky आणि Royal Challenge Whisky या उत्पादनांचाही कारवाईत समावेश आहे.
गोव्यातील Mandexi Distilleries & Breweries येथेही तपासणी व नमुना संकलन करण्यात आले असून महाराष्ट्रातील आणखी सहा उत्पादकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तपासाच्या अंतिम निष्कर्षानंतर पुढील नियामक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.









