गुन्हे तपास अधिक अचूक, वैज्ञानिक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने बेळगांव शहर पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ (Mobile Forensic Van - MFV) दाखल झाली आहे. राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (FSL), बेंगळुरू यांच्या सहकार्याने ही सुविधा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली असून, बेलगाव शहर पोलिसांनाही या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे.
या विशेष वाहनामध्ये घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे शोधणे, त्यांचे दस्तऐवजीकरण करणे, सुरक्षितपणे संकलन व जतन करणे यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
व्हॅनमध्ये क्राईम सीन प्रोटेक्शन किट, रक्त व जैविक नमुना संकलन किट, डीएनए आणि लैंगिक अत्याचार तपासणी किट, शस्त्रास्त्र व स्फोटक तपासणी साहित्य, अंमली पदार्थ तपासणी किट, डिजिटल पुरावे संकलन प्रणाली, अग्नितांडव तपासणी किट, स्टिरिओ मायक्रोस्कोप, फिंगरप्रिंट व फूटप्रिंट किट, हाय इंटेन्सिटी लाईट सोर्स, रेफ्रिजरेटर, GPS युक्त बॉडी-वॉर्न कॅमेरा, जनरेटर, UPS, फ्लड लाईट, LED स्क्रीन तसेच उच्च दर्जाचा कॅमेरा अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
या सुविधेमुळे Scene of Crime Officers (SOCO) घटनास्थळी तातडीने पोहोचून निर्धारित कार्यपद्धतीनुसार (SOP) वैज्ञानिक पद्धतीने तपास करू शकतील. त्यामुळे घटनास्थळावरील पुरावे नष्ट किंवा दूषित होण्याची शक्यता कमी होईल आणि तपासाची गुणवत्ता अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेत वैज्ञानिक पुराव्यांचे महत्त्व अधिक वाढणार असून, दोषींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यासही या तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे.
बेलगाव शहर पोलीस आयुक्तालयाने आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उकल, तपासाची गुणवत्ता आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.









