केरळ येथे 25 ते 29 जुलैदरम्यान पार पडलेल्या CBSE झोनल जलतरण स्पर्धा 2026 मध्ये बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव आणि अक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या चार खेळाडूंनी एकूण 12 पदके (2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य) जिंकत दमदार कामगिरी नोंदवली.
या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर आरोही चित्रागर, निधी कुलकर्णी आणि तन्वी पाई यांची CBSE राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 2026 साठी निवड झाली आहे.
स्पर्धेत जैन हेरिटेज स्कूलची आरोही चित्रागर हिने 100 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, 200 मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर इंडिव्हिज्युअल मेडलेमध्ये रौप्य अशी चार पदके पटकावली.
KLS पब्लिक स्कूलची निधी कुलकर्णी हिने 200 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य तसेच 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर बटरफ्लायमध्ये कांस्य पदके मिळवली.
KLE इंटरनॅशनल स्कूलची तन्वी पाई हिने 50 मीटर आणि 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, तर 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
याशिवाय ज्योती सेंट्रल स्कूलचा वेदांत मिसाळे याने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक जिंकून बेळगावच्या यशात भर घातली.
हे सर्व खेळाडू केएलई सुवर्ण JNMC ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुदूचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या देखरेखीखाली नियमित सराव करत आहेत.
या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे, जयंत हुंबरवाडी, अविनाश पोतदार, मनेक कापाडिया, लता किट्टूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर तसेच विविध हितचिंतकांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या तिन्ही जलतरणपटूंकडून आता आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









