हिंदू कार्यकर्ता मेळाव्याच्या आढावा बैठकीसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
बेळगाव : इम्पोरिया टॉवर, गणेशपूर-हिंडलगा येथे धनंजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
“विद्या ददाति विनयं, विनयाद् याति पात्रताम्” या विचाराला अनुसरून आयोजित या कार्यक्रमात शिक्षण आणि सामाजिक संघटन या दोन्ही क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात पार पडलेल्या 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हजारो हिंदू बांधव-भगिनींच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याच्या नियोजन, व्यवस्थापन आणि कार्याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते.
यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. तर नारायण पाटील यांनी मेळाव्याचा सविस्तर अहवाल सादर केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये बेळगाव ग्रामीणमध्ये प्रथम आलेली कु. प्राजक्ता उत्तम चौगुले, बेळगाव ग्रामीण कन्नड माध्यमातील प्रथम क्रमांकाची कु. राधिका चंद्रशेखर बंगारी, बेळगाव शहर मराठी माध्यमातील प्रथम क्रमांकाची कु. स्नेहा यल्लाप्पा हीरोजी, बेळगाव शहर इंग्रजी माध्यमातील प्रथम क्रमांकाची कु. साईशा पवन देसाई, हायर एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्ट उत्तीर्ण कु. तृप्ती देसाई तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी कु. दिव्या प्रदीप देसाई यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील मेहनत आणि अनुभव सांगत आयोजकांचे आभार मानले.
समारोपात धनंजय जाधव यांनी सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक एकता आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक वर्षे सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
