बेळगाव डी मीडिया | बेळगाव
गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुरल (सुल) धबधब्यावर बेळगावच्या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तब्बल अनेक तासांच्या शोधकार्यानंतर बेळगावच्या रेस्क्यू पथकाने स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
मृत तरुणाची ओळख आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) अशी झाली आहे. मित्रांसोबत सहलीसाठी सुरल धबधब्यावर गेलेल्या आदित्यने पाण्यात उतरल्यानंतर अचानक आलेल्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेनंतर मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा जोर आणि खोल भागामुळे त्याला वाचवता आले नाही. त्यानंतर वाळपई पोलिस, अग्निशमन दल आणि म्हादई अभयारण्य प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली.
मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले होते. रविवारी रात्री प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्य थांबवावे लागले.
सोमवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी बेळगाव रेस्क्यू टीममधील अवधूत तुडवेकर, पदमप्रसाद हुली, विक्की मेहता, शुभम हुली, मायकल पिंटो, रोशन तनावडे आणि आकाश यांनी स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय साधून शोधकार्य केले.
अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पावसाळ्यात धबधबे आणि जलस्थळांवर फिरताना पाण्याचा प्रवाह, खोली आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
