बेळगाव:झाले गेले विसरून जाऊ पुढे पुढे चालू असे म्हणत 2024 या वर्षाला गुड बाय अर्थात निरोप देण्यासाठी आणि तितक्याच उत्साहात 2025 या नवीन वर्षाचे उत्साही स्वागत करण्यासाठी तमाम बेळगाव आणि परिसरातील नागरिक सज्ज झाले आहेत. अत्यंत धूम धडाक्यात स्वागत करण्याचा बेत अनेकांनी रचला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
नववर्षाच्या स्वागताला अवघे काही तास उरले असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. नव वर्षानिमित्त बेळगावातील हॉटेलमध्ये आकर्षक ऑफर देऊ केल्या आहेत. अगदी एखाद्या उत्सवाप्रमाणे नववर्ष स्वागताचा उत्साह बेळगावकरात बघायला मिळतो आहे. नाताळपासून सुरू झालेला हा जल्लोष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच शहर परिसरात ठिकठिकाणी ‘ओल्ड मॅन’ उभे करण्यात आले आहेत.
2025 या नव्या वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्याबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देताना 31 डिसेंबरच्या रात्री वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी ओल्ड मॅनचे दहन केले जाणार आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करताना हे कुठेही अनुचित घटना घडून नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर देखील राहणार आहे. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.