सिद्धगिरी हॉस्पिटल येथे न्यूरो मायक्रोस्कोपची सुविधा
बेळगाव, प्रतिनिधी:
सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणेरी येथे देशातील सर्वप्रथम ZEISS PENTERO 800 S या अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या अत्याधुनिक मशनरीमुळे मेंदू आणि मणक्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहज करणे सोपे होणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शिवशंकर मरजके आणि पूज्य श्री काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणेरी येथील न्यूरो सर्जरी विभागाने अत्यंत जटिल आणि जखमीच्या तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करून आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. अशा अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप भारतात पहिल्यांदाच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाले आहे. या अत्याधुनिक मशनरीमुळे मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांना याचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूल्यांवर आधारित मागील पंधरा वर्षांपासून सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरू आहे. धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे. अशा प्रकारच्या या मशीनमध्ये4k- 3D कॅमेरा सिस्टीम मुळे अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपकरणामुळे कमी वेळेमध्ये आणि सहजपणे मेंदूवरील शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या या मायक्रोस्कोप मध्ये ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक यांना एकाच वेळी मायक्रोस्कोप पाहणे शक्य होणार आहे. इतकी अत्याधुनिक प्रणाली रुग्णांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क न घेता सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथील विभागात उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर सिद्धगिरी हॉस्पिटल विविध शस्त्रक्रिया विभागाने सुसज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.