नवहिंद क्रीडा केंद्राच्या बौद्धिक स्पर्धा रविवारी
बेळगाव:नवहिंद क्रीडा केंद्र, येलूर यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या बौद्धिक क्रीडा स्पर्धा रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.सकाळी ९.३० वाजता नवहिंद भवन येथे या कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष, शिवाजी सायनेकर हे राहणार आहेत. मराठा मंदिर बेळगावचे अध्यक्ष, अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. युनियन बँक येलूर शाखेचे वरिष्ठ प्रबंधक अभिजीत सायमोते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन केले जाणार आहे.
स्पर्धा प्राथमिक गट आणि माध्यमिक गट या दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ, भाषण, गायन आणि रांगोळी स्पर्धा (फ्री हॅन्ड) घेतली जाणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी वेळ तीन तास आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच नवहिंदचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गायन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी भावगीत किंवा भक्ती गीत सादर करणे बंधनकारक आहे. बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट आणावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. इच्छुकानी नवहिंद क्रीडा केंद्र येल्लूर यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे.