*सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सौ.सुनिता यल्लाप्पा उडकेकर यांचा सत्कार*
सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येतो. यावर्षीही सामाजिक कार्य करणाऱ्या, नेहमी शैक्षणिक कार्यात सहभागी असणाऱ्या नेताजी गल्ली, येळळूर येथील सौ सुनीता यल्लाप्पा उडकेकर यांचा शाळेच्या वतीने शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सौ सुनीता उडकेकर या नित्यनेमाने शाळेचे अंगण स्वच्छ करून सडा टाकून त्या ठिकाणी दिनविशेषानुसार रांगोळी काढत असतात. त्याचबरोबर शाळेला देणगी देऊन हातभार लावत असतात.
तसेच गावातील सर्व मंदिरांसमोर सडा टाकून रांगोळी रेखाटून मंदिर परिसर स्वच्छ आणि निर्मळ करत असतात. तशाच पद्धतीने गल्लीतील, गावातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. या सर्व कार्याचा आढावा घेत शाळेच्या वतीने त्यांचा आज सत्कार ठेवण्यात आला. या सत्कार प्रसंगी शाळेच्या एस्.डी.एम्.सी. अध्यक्षा सौ. रुपा श्रीधर धामणेकर, एस्.डी.एम्.सी सदस्या सौ. अल्का कुंडेकर, सौ. दिव्या कुंडेकर, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री आर. एम्. चलवादी, वरिष्ठ शिक्षिका एस्. आर. निलजकर तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचे कार्य आपल्या भाषणातून तसेच गाणी, नृत्य, नाटक यातून सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस्. एस्. बाळेकुंद्री, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री आर. एम्. चलवादी यांनी मांडले तर आभार प्रदर्शन श्री एस्. बी. पाखरे यांनी केले.