मदिहळीतील घटनेनंतर मंत्री सतीश जारकिहोळी यांची महिलेकडून माफी
हुक्केरी तालुक्यातील मदिहळी येथे काही दिवसांपूर्वी मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या समोर घडलेल्या गोंधळाच्या घटनेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्या वेळी आपल्या पतीचा गळपट्टा धरून ओढाताण करणाऱ्या लगमव्वा सनदी यांनी आता स्वतः पुढाकार घेत मंत्री जारकिहोळी यांची माफी मागितली आहे.
दिनांक 9 सप्टेंबर रोजी झालेल्या बेळगाव जिल्हा डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदिहळी येथील पीकेपीएस सदस्यांची सभा झाली होती. या वेळी सदस्य मारुती सनदी यांच्या पत्नी लगमव्वा सनदी यांनी भावनावश होऊन आपल्या पतीशी वाद घालत गळपट्टा धरून ओढले. दुर्दैवाने ही घटना मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या उपस्थितीत घडली होती.
घटनेनंतर आता लगमव्वा सनदी यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करताना म्हटले की, “सतीश जारकिहोळी आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांच्या उपस्थितीत अशी कृती होणे चुकीचे होते. माझ्याकडून हे अनवधानाने घडले असून मला त्याचे मनापासून दुःख झाले आहे.”
त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेवर पडदा पडल्याचे दिसत आहे.