मंत्री सतीश जारकीहोळी यांची नवी झेप : स्वतःच्या हेलिकॉप्टरसह उत्तर कर्नाटकातील पहिले नेते
बेळगाव : लोकोपयोगी मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतःचे नवे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी केले असून, ते लवकरच उड्डाणासाठी सज्ज होणार आहे.
मंत्री जारकीहोळी यांनी आज बेंगळुरूजवळील जक्कूर एरोड्रोम येथे या नव्या हेलिकॉप्टरची पाहणी केली. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत, “लवकरच हे हेलिकॉप्टर आमच्या प्रवासाचा भाग होणार आहे,” असे सांगितले. उत्तर कर्नाटकात स्वतःचे हेलिकॉप्टर बाळगणारे ते पहिले राजकारणी ठरले आहेत.
२ महिन्यांत सुरू होणार प्रवास
जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांचे जवळचे सहकारी असून, राज्यातील ‘अहिंदा’ नेतृत्वाचे महत्त्वाचे चेहरे मानले जातात. दररोज १८ तास काम करून ते पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच २०२८ च्या निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होत आहेत. त्यासाठी हे हेलिकॉप्टर उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांच्या जवळच्या मंडळीत बोलले जात आहे.
हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
नवीनतम सुरक्षाव्यवस्थांनी सज्ज
डबल इंजिनसह अत्याधुनिक तंत्रज्ञान
५ प्रवासी व २ वैमानिकांची आसनव्यवस्था
उंच भागांतूनही टेकऑफ व लँडिंगची क्षमता
अपघाताच्या प्रसंगी प्रवाशांचे रक्षण करणारी शॉक-ॲब्झॉर्बिंग सीट्स
प्रगत वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम
या पाहणीवेळी केपीसीसीचे सरचिटणीस सुनील हुनमण्णर, अली गोरवनकोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हेलिकॉप्टर तपासणीदरम्यानचे मंत्री जारकीहोळी यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.