खानापूर : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर अल्पावधीतच विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप उघडकीस आला आहे. या प्रकरणात खानापूर तालुक्यातील एका युवतीसह अनेक जण बळी ठरले असून, प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
खानापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी मंगळवारी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांच्या मते, सरकारी भरतीची खोटी टूम पसरवून काही व्यक्तींनी बेरोजगारांशी संपर्क साधला. अर्ज केलेल्या उमेदवारांना खात्रीशीर नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले गेले.
त्यातील काव्या येळ्ळूर हिच्याकडून मंजुनाथ बलसरगी नावाच्या व्यक्तीने स्वतःसाठी व तिच्या भावासाठी सरकारी नोकरी लावून देण्याचे सांगून ५.५ लाख रुपये घेतले. तिला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांच्या लेटरपॅडवर बनावट नियुक्ती आदेश देखील देण्यात आला. मात्र, कथित आत्महत्येच्या घटनेचा बहाणा करून तो आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पैसे परत मिळवण्यासाठी काव्याने मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर कित्तूर पोलिसांनी विठ्ठल पडगमनावर याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या तपासावर मोठा दबाव असल्याने संबंधितांना पूर्ण रक्कम न देता केवळ ७५ टक्के पैसे परत करण्याची अट घालण्यात आली. काहींनी दबावाखाली ती अट मान्य केली, तर काहींनी नकार दिला.
तिनईकर यांनी आरोप केला की, नार्को चाचणीत २५ टक्के रक्कम पोलिस व इतरांनीच ठेवून घेतल्याचे समोर आले आहे. तसेच काव्या हिला सात दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस जाणीवपूर्वक उशिरा पाठवण्यात आली, ज्यामुळे ती अंतिम मुदतीच्या शेवटच्या दिवशी मिळेल, अशी युक्ती रचली गेली.
त्यांच्या मते, कित्तूर व नंदगड पोलीस मोठ्या दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खानापूर न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेस काव्या येळ्ळूर व हणमंत गुडलार उपस्थित होते.