“धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत नमूद करा, जातीच्या कॉलममध्ये उपपंथ लिहा”
बेळगाव : राज्य सरकारने हाती घेतलेल्या समाज, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षणात लिंगायत समाजाची नोंद योग्य प्रकारे व्हावी, यासाठी जागतिक लिंगायत महासभेने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी म्हणाले, “सर्वेक्षणाच्या कॉलम क्रमांक 8 मध्ये धर्म विचारला आहे. येथे इतर (Others) या श्रेणीत लिंगायत असा उल्लेख करावा. तर कॉलम क्रमांक 9 मध्ये जाती नमूद करताना लिंगायत या धर्मासोबत आपला उपपंथ लिहावा.”
ते पुढे म्हणाले की, 12व्या शतकात विश्वगुरु बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. यात वर्णव्यवस्था, भेदभाव, स्पर्श-अस्पर्श याला स्थान नाही. समाजसुधारणा, समानता व प्रजासत्तेचा संदेश या धर्माने दिला आहे. त्यामुळे लिंगायत धर्माच्या प्रथा इतर धर्मांपेक्षा वेगळ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोटी यांनी सर्वोच्च न्यायालयातील अनेक निर्णयांचा दाखला देत सांगितले की, धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहिल्यास कोणत्याही उपपंथाला (जसे की इतर आरक्षणाचा लाभ घेणारे गट) शासकीय सवलती गमवाव्या लागणार नाहीत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्णय उपलब्ध आहेत.
अलीकडेच झालेल्या ख्रिश्चन-लिंगायत उल्लेखाबाबत जागतिक लिंगायत महासभेने आक्षेप नोंदविला असून, त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जर सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची हाक देण्याचा इशारा रोटी यांनी दिला.
दरम्यान, 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘बसव संस्कृती अभियान’ने राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये यश मिळवले असून, 5 ऑक्टोबर रोजी बेंगळुरुतील अरमाने मैदानावर समारोप सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लिंगायत बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
पत्रकार परिषदेत महासभेचे पदाधिकारी अशोक मळगळी, मोहन गुंडलूर, प्रवीण चिक्कळी व सी. एम. बूदीहाळ उपस्थित होते.