घुमटमाळ मारुती मंदिरात महापौर ,उपमहापौरांचा सत्कार
बेळगाव -हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व या भागातील नगरसेवकांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ ,स्मृतीचिन्ह आणि श्रीफळ देऊन करण्यात आला.
मारुती मंदिर हे वार्ड क्रमांक 29 व वार्ड क्रमांक 41 यांच्यामध्ये आहे. वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार हे असून वार्ड क्रमांक 29 चे नगरसेवक नितीन जाधव हे आहेत. या दोघांचे या मंदिराला नेहमीच सहकार्य मिळत असून त्यांच्या सहकार्यातूनच मंदिराजवळील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शेजारच्याच वॉर्ड मधील नगरसेवक विना विलास जोशी या उपमहापौर आणि अभिजीत जवळकर हे बाजूच्या वार्डाचे नगरसेवक आहेत.
या सर्व नगरसेवकांचा मारुती मंदिराशी निकटचा संबंध आहे. हे लक्षात घेऊन या चौघांचा सन्मान करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट कमिटीने घेतला. त्याला अनुसरून हनुमान जयंतीदिनी त्या चौघांचा सन्मान करण्यात आला. महापौरांचा सन्मान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपमहापौरांचा सन्मान उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, जवळकरांचा सन्मान ट्रस्टी बाबुराव पाटील व नितीन जाधव यांचा सन्मान सचिव प्रकाश माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी अनंत लाड यांनी प्रास्ताविक केले, चंद्रकांत बांडगी यांनी स्वागत केले तर रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले.
याप्रसंगी ट्रस्ट कमिटी सदस्य सर्वश्री गोपाळ बिरजे, नेताजी जाधव, सुनील चौगुले, चंद्रकांत पवार ,विक्रम चांडक, ऍड के वाय साळवी, पुजारी बाळू किल्लेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “घुमटमाळ मारुती मंदिर हे या भागातील सर्वात जुने मंदिर असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहे. या मंदिराच्या परिसरातील विकास कामासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” अशी ग्वाही महापौरासह सर्वांनी आपल्या भाषणात देऊन सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.