नेहमी कडक शिस्तीत कवायत करत असलेले , नेमबाजीचा सराव करणारे सैनिक आज दहीहंडी खेळताना पाहायला मिळाले.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आणि दहीहंडी अपूर्व उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
मिलिटरी महादेव मंदिर येथे मध्यरात्री देवकीनंदन भगवान श्री कृष्णाच्या जन्म सोहळ्याने या उत्सवाची सुरुवात झाली.त्या नंतर शेवटी रेजिमेंटल सेंटर येथे उत्साही वातावरणात दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
उंचावर लटकवलेले दह्याने भरलेले मडके फोडण्याच्या दहीहंडी स्पर्धेत मराठा सेंटर मधील जवानांचे चार संघ सहभागी झाले होते. बावीस फूट उंचावर दहीहंडी बांधण्यात आली होती .चार थर रचून उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी जवानांनी चालविलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पहिल्या फेरीत कोणताही संघ दहीहंडी फोडू शकला नाही.दुसऱ्या फेरीत मात्र रेकॉर्डस संघाने दहीहंडी फोडून जल्लोष केला.
विजेत्या रेकॉर्डस संघाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.