गरिबांचे महाबळेश्वर तापले
बेळगाव प्रतिनिधी:
गरिबांचे महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगळवारी बेळगाव शहराच्या कमाल तापमानामध्ये 36 डिग्री ची नोंद करण्यात आली. यामुळे नागरिक बाजारपेठेमध्ये येताना छत्री, गॉगल, टोपी घालून येत होते.
दुपारच्या वेळेला गर्दी दिसत नव्हती. वाराही बंद होता त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांची पावले कोल्ड्रिंक्सच्या दुकानाकडे वळताना दिसून आली.
कोल्ड्रिंक्स दुकानाबरोबरच्या नारळ पाणी, कलिंगडे ,सरबत ,कोकम ,लिंबू पाणी , ताक यांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. गर्मी सहन होत नसल्यामुळे गर्मी पासून बचाव करण्यासाठी कार्यालयामध्ये तसेच घराघरांमध्ये पंख्याची घरघर सुरू होती. सध्या मार्च महिना सुरू आहे. अजूनही दोन महिन्याहून अधिक काळ गर्मीचा तडाका बेळगावकराना सहन करावा लागणार आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असल्याने बेळगावचे नागरिक मोठ्या वळवाच्या प्रतीक्षेत आहेत.
सकाळी नऊ वाजल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उन्हाचा तडाका जबरदस्त जाणवत आहे. त्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये कामे उरकून घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. टोपी, गॉगल च्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.