साहित्य संमेलन: सीमाभागाची ऊर्जास्थाने
– सीमाकवी रवींद्र पाटील
“साहित्य हे समाजाच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. विशेषतः सीमाभागात, जिथे भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे प्रश्न अधिक तीव्र असतात, तिथे साहित्य संमेलन म्हणजे ऊर्जास्थानच ठरते. सीमाभागातील साहित्य संमेलने फक्त साहित्यिक चळवळीपुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐक्य निर्माण करणारी केंद्रे बनतात.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसारख्या सीमाभागात मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी अनेक प्रयत्न होत आले आहेत. भाषावादी संघर्षांच्या छायेत या भागातील साहित्यिक चळवळ अधिक जोमाने वाढत गेली. सीमाभागातील लेखक, कवी, विचारवंत यांनी आपल्या लेखणीतून सीमाभागाच्या व्यथांना वाट मोकळी करून दिली आणि त्यातूनच साहित्य संमेलनांची प्रेरणा मिळाली.
साहित्य म्हणजे केवळ अक्षरांचा खेळ नाही, तर तो संस्कृतीचा आत्मा आहे. हे शब्द केवळ कागदावर उमटत नाहीत, तर मनामनांत जागृतीचे वणवे पेटवतात. विशेषतः सीमाभागात, जिथे भाषा आणि अस्मितेच्या वादळाने मराठी जनतेला संघर्षाच्या लाटांवर झुलवले आहे, तिथे साहित्य संमेलन म्हणजे प्रेरणादायी दीपस्तंभ ठरते .
सीमाभागातील साहित्य संमेलने म्हणजे केवळ साहित्यिकांचे संमेलन नव्हे, तर ती मराठी अस्मितेची शक्तिपीठे आहेत. येथे शब्दातून क्रांती घडते, विचारांचे शिखर गाठले जाते आणि संस्कृतीच्या जतनासाठी नवे मार्ग शोधले जातात.
*साहित्य संमेलनांचे योगदान*
सीमाभागातील साहित्य संमेलन म्हणजे केवळ साहित्यिकांची वैचारिक मांदियाळी नव्हे, तर ते मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. या संमेलनांमुळे –
1. मराठी भाषेचा जागर – मराठी भाषा ही केवळ बोली नाही, तर ती एक संस्कृती आहे, हे नव्या पिढीला सांगण्याचे काम या संमेलनांमधून होते.
2. सीमाभागातील लेखकांना व्यासपीठ – येथील स्थानिक लेखक, कवी, समीक्षक यांना राज्यस्तरावर ओळख मिळते.
3. संघर्षशील मराठी जनतेला आधार – सीमाभागातील मराठी बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आहे. साहित्य संमेलने त्यांच्या संघर्षाला बळ देतात.
4. सांस्कृतिक ऐक्याचा सेतू – कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्यिक, कलाकार, अभ्यासक यांना एकत्र आणण्याचे कार्य संमेलनाद्वारे होते.
बेळगावमध्ये झालेल्या साहित्य संमेलनांनी मराठी भाषा चळवळीला मोठी चालना दिली आहे. साहित्य संमेलनाने सीमाभागात मराठी चळवळीला नवे बळ दिले.
सीमाभागातील अनेक लेखक, कवी, पत्रकारांनी आपल्या लेखणीतून सीमावासीयांची व्यथा मांडली. त्यांनी मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लेखन केले आणि समाजाला दिशा दिली. सीमाभागात अजूनही मराठी साहित्य आणि संस्कृतीसाठी नवे साहित्यिक निर्माण होत आहेत.
सीमाभागातील साहित्य संमेलने ही फक्त साहित्याचे नव्हे, तर अस्मिता आणि संघर्षाचे केंद्रस्थान आहेत. ती मराठी जनतेच्या हक्कासाठी, भाषेसाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी उर्जा देणारी ठिकाणे आहेत. त्यामुळे सीमाभागातील साहित्य संमेलने अधिक व्यापक प्रमाणात आणि नव्या उर्जेने आयोजित करणे आवश्यक आहे.
सीमा भाग म्हणजे केवळ भूगोलातील रेषा नव्हे, तर ती अस्मितेची, आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची कथा आहे.
“साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाज प्रबोधनाचे आणि अस्मिता जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे.”सीमाभागातील साहित्य संमेलनांमधून हीच उर्जा मराठी मनाला मिळत राहो!
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, दिल्लीच्या भूमीवर सीमाभागाच्या संघर्षाची व्यथा माझ्या काव्यातून मांडण्याची संधी मिळाली. सीमाभागातील वेदना, अन्याय आणि अस्मितेचा लढा यांना शब्दरूप देण्याचे काम मी सातत्याने करत आलो आहे.
कवी, लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांनी या व्यथांना आवाज दिला, पण दिल्लीने ऐकले का? हा प्रश्न कायम आहे. माझ्या काव्यातून सीमावासीयांचा संघर्ष दिल्लीपर्यंत पोहोचावा, हीच माझी धडपड आणि ध्येय!
“तख्त दिल्लीचं, माय गल्लीत रडते “या काव्यातून व्यथा मांडली
“तख्त दिल्लीचं झळाळत आहे,
पण माय गल्लीत रडते!
मराठीच्या लेकरांना इथे,
दडपशाही झेलावी लागते! ”
पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन मराठा मंदिर, बेळगाव येथे होणार आहे. सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय कळमकर व शाहीर अभिजित कालेकर यांचा ‘जागर लोक संस्कृतिचा ‘ सादर करणार आहेत .हा मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारा सोहळा असणार आहे. ही साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी!