महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र.
*महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींकडे सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करावी*
युवा समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना खालील आशयाचे पत्र पाठवून सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब
महाराष्ट्र शासन यांसी
विषय – भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची तातडीने भेट घेवून सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत यासाठी
आदरणीय महोदय सस्नेह जय महाराष्ट्र
महोदय नमूद विषयानुसार मागील ६८ वर्षे बेळगावसह ८६५ गावे महाराष्ट्र राज्यात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. आपण स्वतः सिमालढ्यात सक्रिय सहभाग घेवून चळवळ जवळून पाहिली आहे, त्यामुळे या प्रश्नाबाबत आपण अवगत आहात. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आसनस्थ झाल्यानंतर हा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा निर्माण झाली होती, पण ठोस अशी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत याबाबत खंत वाटते.
डिसेंबर २०२२ मध्ये भारताचे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या मुख्यंमंत्री यांची महत्वपूर्ण बैठक झाली होती या बैठकीत सीमाभागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले होते, त्यानुसार दोन्ही राज्यातील ३-३ मंत्र्यांची कमिटी स्थापन करावी त्यासोबतच, सीमाभागातील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आला होता. पण आज जवळपास २ वर्षे होत आली तरीही याबाबत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला तरीही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दिवसेंदिवस सीमाभागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे, मराठी भाषिक कन्नड भाषेच्या सक्तिखाली भरडले जात आहेत, भाषिक अधिकारांवर गदा आणली जात आहे, त्यातच २००४ पासून मा. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी दाखल दाव्यात गती प्राप्त झालेली दिसत नाही त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक हतबल झाला आहे, म्हणून महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून आपण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करावी अशी समस्त सिमावासिय मराठी भाषिकांच्या वतीने मागणी आहे.
न्यायालया बाहेर आता तोडगा काढणे आवश्यक असून ही बेळगावसह ८६५ गावातील सिमाभागमध्ये होरपळलेल्या गेली ६८ वर्षे लढणाऱ्या मराठी भाषिकांची इच्छा आहे, तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष देवून निवडणुकीपूर्वी मा. पंतप्रधानांची भेट घेवून प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दिली.