महिलांसाठी मोफत बस प्रवास सेवेचा शुभारंभ
महिलांसाठी मोफत बस प्रवास करण्याच्या शक्ती योजनेचा कर्नाटकात रविवारी शुभारंभ करण्यात आला.मोफत बस सेवेच्या पहिल्याच दिवशी महिला प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पाच योजना जाहीर केल्या होत्या.त्यापैकी शक्ती या महिलासाठी असलेल्या शक्ती योजनेचा बेळगावात शुभारंभ करण्यात आला.बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हिरवा ध्वज दाखवून या योजनेचा शुभारंभ केला .
मध्यवर्ती बस स्थानकात शक्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला.बसला फुगे आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती.बसमधील महिला प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी बसमध्ये घोषणा देऊन आणि नृत्य करून आनंद व्यक्त केला.महिला प्रवाशांना त्यांचे आधार कार्ड पाहून बस कंडक्टरनी मोफत प्रवासाचे तिकीट दिले.मंत्री आणि मान्यवरांनी मध्यवर्ती बस स्थानक ते वडगाव असा प्रवास केला.