पंचमसाली समाज बांधवांवर लाठी हल्ला
बेळगाव:
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आंदोलन करणाऱ्या लिंगायत पंचमसाली समाज बांधवांवर पोलिसांकडून लाठी हल्ला झाला आहे. पंचमसाली समाजातील बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. ते आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जात असताना त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला.
यावेळी आंदोलन करणारे पंचमसाली समाजातील बांधव गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच हायवे पूर्णपणे जाम झाला होता. या गोंधळामुळे हायवेवर अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. पोलिसांच्या लाठी हल्ल्यामुळे नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.या लाठी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंचमसाली समाजातील बांधवांना शहरातील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर काही पोलीस देखील किरकोळ जखमी झाले होते.ते देखील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या मागणीचे निवेदन देऊ इच्छिणाऱ्या आंदोलन करणाऱ्याना पोलिसांकडून अशा प्रकारे मारहाण होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल जनतेतून विचारण्यात येत आहे.