*निपाणी येथील कु. माधुरी मेस्त्री यांना ‘आदर्श महिला’ पुरस्कार प्रदान*
कोल्हापूर: निपाणी येथील वृत्त निवेदिका कु. माधुरी नंदकुमार मेस्त्री यांना कृती फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने ‘आदर्श महिला’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च २०२५ रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक भवनात सायंकाळी ६ वाजता ‘महिला सुसंवाद’ या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कृती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रशांत चुयेकर (आवाज इंडिया न्यूज चॅनेलचे संपादक) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये नम्रता चौगुले (नायब तहसीलदार), सौ. पल्लवी सागर यादव (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अनुराधा भोसले (अवनी संस्था, कोल्हापूर), सेवानिवृत्त शिक्षक जी.आर. पाटील, प्रसिद्ध वक्ते प्रमोद हर्षवर्धन आणि अहर्तिक योगी विजय दीक्षित यांचा समावेश होता. प्रमुख व्याख्याते अरविंद खैरे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कु. माधुरी मेस्त्री यांनी शालेय जीवनापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिकांसह उत्तम कामगिरी केली आहे. वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक ठिकाणी वृत्त निवेदिका म्हणून काम केले आहे. निपाणी, कोल्हापूर, मिरज, बेळगाव, गडहिंग्लज, जयसिंगपूर, चिकोडी अशा विविध ठिकाणी त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून काम केले आहे. याआधी २०२३ मध्ये क्रांतिसूर्य फाउंडेशन यांच्यावतीने त्यांना ‘आदर्श वृत्त निवेदिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
माधुरी मेस्त्री यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यावर्षी ‘आदर्श महिला’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या मातोश्री श्रीमती वसुधा नंदकुमार मेस्त्री या त्यांच्या सोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ यांनी केले. https://dmedia24.com/5th-all-india-belgaum-marathi-literature-conference/
कृती फाउंडेशन यांनी समाजात विशेष कार्य करणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.