खानापूर तालुक्यातील आमगावच्या एका माऊलीला आरोग्याची समस्या जाणवल्याने गावातील मंडळींनी तीरडीचा स्ट्रेचर बनवून त्यावरून तिला पाच किलोमीटर पर्यंत पावसात खांद्यावरून आणले, ही बातमी प्रसारित झाल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी,माजी लोकप्रतिनिधी व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आठवण झाली, त्यानंतर त्रस्त माऊलीची तसेच तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदत अथवा धीर दिला. ही जरी तात्पुरती दिलासा देणारी बाब असली तरी आज शेवटी त्या माऊलीने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. गैरसोयीमुळे २१ व्या शतकात अशी घटना घडणे ही लाजीरवाणी बाब असून प्रशासन आणि त्याला हाताशी धरणारे लोकप्रतिनिधी झोपी गेलेत का? असा प्रश्न पडतो.
जसा खानापूर तालुका नैसर्गिक सौदर्य व संपत्तीने नटलेला आहे, तसा तो असुविधा व गैरसोयींनीही त्रस्त आहे हे याच उत्तम उदाहरण आहे. गावागावात बसची वानवा असताना शहरात हायटेक बसस्थानक,गावागावात रुग्णांना ये,जा करण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नसताना मोठं इस्पितळ, गावागावात वीज नसताना हेस्कॉमचे नूतन कार्यालय, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा झालेय, असे करण्यामागे हे सर्व भ्रष्टाचाराचे “कुरण” बनले की काय असा संशय येऊ लागलाय, मग तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागाला तात्पुरती मलमपट्टी करून “राजकीय” फायद्यासाठी श्रेय न घेता, आता या नागरी सुविधांसाठी मोठ्या सर्जरीची आवश्यकता असून, सर्व पक्षीयांनी याचा विडा उचलावा व तालुक्यातील जनतेला या जीवघेण्या असुविधापासून मुक्ती द्यावी, ही जनतेची खरी मागणी आहे.