प्रतिनिधी /बेळगाव :बेळगाव शहर हे वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना स्थळांनी नटलेलं शहर आहे. शहर आणि परिसरात स्थापन करण्यात आलेली आणि अनेक वर्षांपासून वैभवात भर घालणारी असंख्य प्रार्थना स्थळे आहेत. याचपैकी एक म्हणजे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आवारातील कमल बस्ती आठशे वर्षाहुन अधिक काळाचा इतिहास सांगणारे प्रार्थना स्थळ जैन समुदायाचे प्रेरणास्थानच, मात्र ऐतिहासिक वारसा म्हणून जपली जाणारी ही बस्ती सर्वधर्मयांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.कमल बस्ती मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने केलेली कोरीव कामाची झलक पाहायला मिळते. या बस्तीचा मुख्य मंडप केवळ खांबावर तोलला गेला आहे. ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात पाच चौकोन कोरलेले आहेत.या कोरीव कामातुन उत्तम हस्तकलेचे दर्शन घडते. कोरीव काम केलेल्या प्रत्येक चौकोनावर सिंहमुख आहे. मंगल कलशावर पद्मासनस्थ जिनबिंब आहे. यावर सिंहाची रांग आहे. ही कोरीव कला गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.मंदिराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तरेला जोडवड आहे. पावसाचे पाणी आत शिरू नये याची काळजी तत्कालीन शिल्पकारांनी घेतलेली यामधून दिसून येते. स्तंभाचा वरचा भाग गोलाकार असून खालील भाग चौकोनाकृती आहे.कमल बस्तीत तीन पिढ्यांचे 24 तीर्थानकारांच्या मूर्तीचे काम दगडातून साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही बस्ती 800 हून अधिक वर्षे कोणत्याही फाउंडेशनशिवाय आजही दिमाखात उभी आहे.आज पर्यंत अनेक भूकंप पाऊस पूर अशा नैसर्गिक आपत्तीत बस्ती ला कोणताच धोका झालेला नाही. 1992 ते 1993 मध्ये पुरातत्व खात्याकडून कमल बस्ती चा जिर्णोद्धार करण्यात आला. दगडातील कोरीव कामाचा उत्तम नमुना या ठिकाणी पर्यटकांना पहावयास मिळतो .बस्तीत प्रवेश करताच पर्यटकांना एक वेगळीच अनुभूती पाहायला मिळते.रंग मंडप,महामंडप,अंतराळी आणि गर्भगृह अशा चार विभागात कमल बस्तीची रचना करण्यात आली आहे. तसेच बस्तीचा परिसर मोठा असून बाहेर नागरिकांना बसण्याकरिता देखील आसनाची सोय करण्यात आली आहे. बेळगावचे पर्यटन क्षेत्र म्हणून कमल बस्ती चा लौकिक झाला आहे
D Media 24 > Local News > *पर्यटनक्षेत्र म्हणून कमल बस्ती चा झाला लौकिक*