चित्रसेन शबाब ऊर्फ यल्लारी. बा. सुतार यांना कालिदास पुरस्कार जाहीर
पणजी : मडगाव येथील ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक चित्रसेन शबाब ऊर्फ यल्लारी. बा. सुतार सर यांना कोकण मराठी परिषदेचा यावर्षीचा कविकुलगुरू कालिदास पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रसेन शबाब हे मूलतः चित्रकार असून ते सत्यकथेच्या काळापासून लेखन करीत आहेत. सत्यकथा, मौज, किर्लोस्कर, दीपावली अशा नावाजलेल्या दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य. प्रसिद्ध होते. २५ जून १९४४ रोजी जन्मलेले य. . बा. सुतार यांनी आर्ट मास्तर व जी. डी. आर्टची पदवी घेतलेली आहे. वाळपई, बाळ्ळी आणि आगोंद येथे त्यांनी सरकारी विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. काणकोण बालभवन केंद्रात त्यांनी काही काळ प्रभारी म्हणून काम केले आहे.
त्यांना काव्यलेखन व इतरही लेखन केले आहे. त्याशिवाय त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. अनेक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे व रेखांकनाचे काम
त्यांनी केले आहे. चित्रे आणि पोर्टेटमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. ‘पॉझ’, डोळ्यांची डोलकाठी’, ‘कवितेचा कॅन्व्हास’ आणि ‘ते नभही बोलत ‘नाही’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘पाषाणकळी’ या कोकणी कादंबरीचा त्यांनी केलेला अनुवाद अभिनंदन प्रकाशनने प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी ‘नवलकथा’ हे सदर चालवले होते. राज्याच्या इयत्ता पहिली ते चवथीच्या अभ्यासमंडळावर काम केले. तसेच १९८० ते ८४ या काळात पाचवी ते सातवीच्या अभ्यासमंडळाचे काम पाहिले आहे. चित्रकलेच्या अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत.
तत्कालीन राष्ट्रपती आर. के. नारायणन यांच्या हस्ते त्यांना १९९७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ व पत्रलेखन संघटनेतर्फे त्यांना राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे. हैदराबादच्या भारतीय विकास अकादमीतर्फे त्यांना प्रतिभा सन्मान मिळाला आहे. १९ जून रोजी त्यांना हा पुरस्कार आयएमबी पणजी येथे प्रदान करण्यात येईल