ज्योतिबाच्या नावानं चांगभलं चैत्र यात्रा उत्साहात
बेळगाव:
जोतिबाच्या नावानं चांगभलं असा अखंड गजर करत लाखो भाविकांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले. चैत्र यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध राज्यातून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. ज्योतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
शनिवारी चैत्र यात्रेचा मुख्य दिवस होता. भाविकांनी मात्र शुक्रवारपासूनच जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ज्योतिबाला दवणा वाहण्यासाठी आणि जोतिबाचे दर्शन करण्यासाठी लाखो भाविकांनी डोंगरावर उपस्थिती दर्शवली होती. मात्र प्रचंड गर्दीमुळे काही भक्तांना आत जाऊन दर्शन घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही भक्तांनी ज्योतिबा मंदिराच्या परिसरात उभे राहून मुखदर्शन घेतले. गुलालाची, खोबऱ्याची उधळण करत तसेच ज्योतिबाच्या नावाने चांगभलं असा अखंड गजर करत दर्शन घेतले.
या दरम्यान विविध भागातून आलेल्या सासनकाठया नाचवत तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली.
भक्तांची चांगली प्रवास व्यवस्था व्हावी यासाठी परिवहन महामंडळाकडून कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथून यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आले होत्या. त्यामुळे भक्तांची सुद्धा चांगली सोय झाली. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बेळगाव मधील शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिर मध्ये देखील भक्तांनी ज्योतिबा दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर गुलालाने माखलेला दिसून आला.