जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन
बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हते तर हाडाचे शिक्षकही होते. म्हणूनच त्यांनी “दर्पण”च्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पत्रकारितेबरोबरच शिक्षक, सामाजिक सुधारणा, साहित्य, संशोधन आदी क्षेत्रात त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी विलास अध्यापक यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी “दर्पण” हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचे रोपटे लावले. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. वृत्तपत्र क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे पण स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारांनी ज्या ध्येयवादाने पत्रकारिता केली ती आज राहिली नाही. ती सत्तासरण झाली आहे. त्यामुळे जनतेचा आवाज दडपला जातो. तिचे मूळ प्रश्न दुर्लक्षित केले. जातात याबद्दल शहापूरकर यांनी खंत व्यक्त केली.
कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले. पत्रकार संघामध्ये झालेल्या या कार्यक्रमास सदानंद सामंत, सुहास हुद्दार, महेश काशीद, शिवराज पाटील, कृष्णा कांबळे यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.