आयपीएस संदीप पाटील यांचा डेनमार्कमध्ये ‘आयर्नमॅन’ ट्रायथलॉन विजय – बेळगावात गौरव
बेळगाव :
कर्नाटक कॅडरचे दक्ष, कार्यक्षम आणि तडफदार आयपीएस अधिकारी श्री. संदीप पाटील यांनी डेनमार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त त्यांचा सन्मान काहेर (KAHER) आणि स्विमर्स क्लब, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आला.
ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांपैकी एक असून त्यामध्ये 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि तब्बल 42 किमी धावणे असा पराक्रमी टप्पा असतो. अपार चिकाटी, धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर श्री. पाटील यांनी ही स्पर्धा 14 तास 45 मिनिटांत पूर्ण केली.
सुर्णा जेएनएमसीच्या ऑलिम्पिक मापदंडाच्या जलतरण तलावात झालेल्या छोटेखानी सत्कार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण प्रशिक्षक श्री. उमेश कालघटगी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवले.
या वेळी बोलताना आयपीएस संदीप पाटील यांनी तंदुरुस्तीकरिता जलतरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच केएलई सोसायटीने जेएनएमसी कॅम्पसवर उपलब्ध करून दिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा ही तरुण पिढीसाठी मोठी संधी असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी अक्षय शेरगर, गोवर्धन काकतकर, लक्ष्मण कुम्भार, इम्रान उचगावकर, सिमरन गोंदाळकर, विनोद डोडमणी, शिवाजी मनमोडे यांसह जलतरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.