बेळगावात आयपीएलची क्रेझ
बेळगाव प्रतिनिधी:
सध्या आयपीएलचा अठरावा हंगाम सुरू झाला आहे. दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने होत आहेत. आयपीएल अत्यंत आवडीने आणि सवड काढून पाहणारे क्रिकेट प्रेमी बेळगाव शहर आणि परिसरामध्ये भरपूर आहेत. कोणता खेळाडू कोणत्या सामन्यात किती धावा काढणार, आणि कोणता बॉलर किती विकेट घेणार तसेच कोणती टीम विजयी होणार याबाबत क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा होत आहे.
शनिवारी आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये उद्घाटनाचा सामना झाला. या सामन्यांमध्ये कोणता खेळाडू अधिक धावा करणारा आणि कोणती टीम जिंकणार यावर सर्वाधिक पैजा लावण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आता आयपीएल संपेपर्यंत म्हणजेच अंतिम सामन्यापर्यंत अशाच पद्धतीच्या पैजा आपल्याला बेळगाव आणि परिसरामध्ये लागल्याचे दिसून येणार आहेत. क्रिकेट आणि बेळगाव चे जुने नाते आहे. वेळ काढून आणि सवडीने क्रिकेट खेळणारे आणि क्रिकेट मॅच पाहणारे असंख्य क्रिकेट चाहते बेळगाव शहरांमध्ये आहेत. आयपीएल मधील प्रत्येक सामन्याचा आनंद ते घेत आहेत.
पहिल्याच सामन्यामध्ये आरसीबीने केकेआर चा पराभव करून विजयी सुरुवात केल्याने क्रिकेट शौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या सामन्यांमध्ये रन मशीन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीने नाबाद 59 धावा केल्याने त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. त्यामुळेच आरसीबी टीमच्या समर्थकांचा त्याला पाठिंबा वाढत आहे.