कसोटीवर भारताची मजबूत पकड
ऑस्ट्रेलिया अजूनही 83 धावांनी पिछाडीवर
पर्थ:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी शुक्रवार 22 नोव्हेंबर पासून ऑप्टस स्टेडियम येथे सुरू झाली. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 150 धावांमध्ये आटोपला. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 67 धावा झाल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर 83 धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या शिल्लक तीन विकेट झटपट घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा प्रयत्न राहणार आहे.
भारतीय डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि लोकेश राहुल यांनी केली. संघाच्या फक्त पाच धावा झाल्या असताना यशस्वी जयस्वाल शून्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला देवदत्त शून्य धावसंख्येवर बाद झाला त्यामुळे भारताची स्थिती दोन बाद 14 अशी खराब झाली.
त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली लोकेश राहुलला साथ देण्यासाठी मैदानात आला. दोघांनी धावफलक हलता ठेवला. मात्र धावफलकावर 32 धावा लागल्या असताना विराट कोहली पाच धावांवर बाद होऊन परतला. दुसऱ्या बाजूने मात्र लोकेश राहुल संयमी खेळी करत होता.
ऋषभ पंतने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. मात्र एकापाठोपाठ एक विकेट पडतच गेल्या. लोकेश राहुल 26 धावांवर दुर्देवीरित्या बाद ठरला. त्यामुळे भारताची अवस्था सहा बाद 73 अशी झाली होती. अशावेळी भरोशाचा फलंदाज ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांनी भारतीय संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 48 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच भारतीय संघ दीडशे धावांपर्यंत पोहोचू शकला. ऋषभ पंत 37 धावांवर तर नितीश कुमार रेड्डी 41 धावांवर बाद झाला.
नितीश कुमार रेड्डी याने भारताकडून सर्वाधिक 41 धावा केल्या. मोहम्मद शिराज 0 धावसंख्येवर नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताने पहिल्या डावांमध्ये 49.4 षटकांमध्ये सर्व बाद 150 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 29 धावा देऊन चार विकेट घेतल्या. भारताच्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने 11 अवांतर धावा दिल्या.
ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. 14 धावा झाल्या असताना भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर जसप्रीतसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहला मोहम्मद शिराज आणि हर्षित राणा यांनी गोलंदाजी मध्ये चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. आश्चर्य म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या मारनेस याने 52 चेंडूंचा सामना करत फक्त दोन धावा केल्या. अत्यंत संथ पद्धतीचा खेळ त्याने केला. शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा अलेक्स करी हा 19 धावांवर आणि मिचल स्टार हा सहा धावांवर नाबाद खेळत आहेत.
हर्षितची पहिली विकेट
भारतीय गोलंदाज हर्षित राणा याने ट्रॅव्हिस हेड याला त्रिफळा बाद करून कसोटी क्रिकेट मधील आपली पहिली विकेट घेतली.
जसप्रीत बुमराह याचा विक्रम
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमरा याने आपल्या नावे एक विशेष विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ याला शून्यावर बाद करणारा जसप्रीत बुमरा हा जगातला दुसरा आणि भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.