हलकर्णी, चंदगड: राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर आणि पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. हा प्रशिक्षण कार्यक्रम 4 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सौ. सुमन सुभेदार (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, चंदगड), मा. श्री. आर. बी. गावडे (उपप्राचार्य, वाय. सी. एम., हलकर्णी), तसेच BRC प्रशिक्षण समन्वयक मा. श्री. सुनिल पाटील आणि भाऊ देसाई उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमात 89 नवनियुक्त शिक्षकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. महादेव साळवे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक सौ. सुमन सुभेदार मॅडम यांनी शिक्षकांसमोर शैक्षणिक क्षेत्रातील नव्या संकल्पना मांडल्या आणि शिक्षक म्हणून जबाबदारी कशी पार पाडावी यावर सखोल मार्गदर्शन केले. उपप्राचार्य आर. बी. गावडे सरांनी शिक्षकांना विविध शैक्षणिक तंत्र आणि कौशल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा दिली, तर शिवाजी पाटील सर यांनीही महत्वाचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सत्रांचे सुलभक म्हणून श्री. महादेव साळवे, संजय साबळे, रवींद्र पाटील, विश्वास पाटील, आणि प्रा. अर्चना रेळेकर या शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवींद्र पाटील सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजय साबळे सर यांनी केले.
प्रशिक्षणाच्या आगामी सत्रांमध्ये शिक्षकांना व्यावसायिक कौशल्ये आणि शैक्षणिक अनुभव आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम आणि सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.