कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने समर कॅम्पचे उद्घाटन
शहरातील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने कॅन्टोनमेंट मराठी, उर्दू,इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन शाळेच्या टर्फ मैदानावर संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोर्डाचे सी. ई. ओ. राजीव कुमार व उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागाचे आमदार असिफ शेठ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.आमदार असिफ शेठ यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर या समर कॅम्पचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.कॅन्टोनमेंट बोर्डाच्या तिन्ही शाळांमध्ये जवळपास 1600 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेतील मुलांमध्ये शैक्षणिक प्रगती बरोबरच शारीरिक व मानसिक प्रगती व्हावी यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.या कॅम्पमध्ये फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल,हॅन्डबॉल, कबड्डी, स्केटिंग या मैदानी खेळांसोबतच संगीत,चेस, व स्वसंरक्षणासाठी ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.https://dmedia24.com/selection-test-on-behalf-of-belgaum-district-sports-karate-association/
हे प्रशिक्षण बुधवार दि. 3 एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत चालणार असून सदर प्रशिक्षण विनामूल्य करण्यात आले आहे. यासाठी अनेक देणगीदारानी मदतीचा हात पुढे केला आहे. हायलॉक हाईड्रॉटेकनिकचे दिलीप चिटणीस यांच्यावतीने पंचवीस हजार रुपये,महेश फाउंडेशनचे महेश जाधव यांच्या वतीने दहा हजार रुपये व दीपक जगदाळे, फ्रीमसन्स लॉज विक्टोरिया क्र. 9 यांच्या वतीने दहा हजार रुपये असे एकूण पंचेचाळीस हजारांचे क्रीडा साहित्य या कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.या सर्व देणगीदारांची बोर्डाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिफ सेट यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष उदयसिंग रजपूत, बोर्डाचे सदस्य सुधीर तुप्पेकर,ऑडिटर मॅरीलीन कोरिया,समाजसेवक संतोष दरेकर, बिटा स्पोर्टचे सौरभ बिरजे,क्रीडा प्रशिक्षक सुधाकर चाळके,रोहिणी पाटील,सूर्यकांत हिंडलगेकर, शाळा सुधारणा कमिटी सदस्य,कार्यालयीन विभाग प्रमुख एम. वाय. तालुकर, अभियंता सतीश मन्नूरकर आदी विभाग प्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समर कॅम्पसाठी सीइओ राजीव कुमार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झकीया मुजावर यांनी केले तर आभार वंदना कुंभार यांनी मानले.