गोकाकमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शुभारंभ; जनतेची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण – मंत्री सतीश जारकीहोळी
गोकाक : गोकाक शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यामुळे या भागातील विद्यार्थी व नागरिकांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
गोकाकच्या बैळीकाटा परिसरातील एन.एस.एफ. आवारात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या अंतर्गत नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाली असून, मंत्री जारकीहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.
या महाविद्यालयामुळे गोकाकसह आजूबाजूच्या सहा तालुक्यांतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. लवकरच कर्मचारी नियुक्ती होणार असून, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीन अभ्यासक्रमांना सरकारने मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक दोन वर्षांसाठी सतीश शुगर्स कॉलेजच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले असून, स्थानिक आमदारांनी एपीएमसी परिसरात जागा निश्चित केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कायमस्वरूपी इमारत उभारण्यात येईल, असे जारकीहोळी यांनी आश्वासन दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष देशपांडे यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांतून गोकाकमध्ये नवे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले आहे. कमी खर्चात या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी मिळत आहे. याबाबत व्यापक प्रचार व्हावा” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी विवेक जत्ती, महेश चिकोडी यांसह महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.