**बेळगाव जिल्हा न्यायालयात नवीन समुदाय भवनाचे उद्घाटन**
बेळगाव जिल्हा न्यायालय परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज समुदाय भवनाचे औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रामचंद्र हुद्दार, आमदार आसिफ सेठ यांसह अनेक न्यायविद, प्रशासकीय अधिकारी व वकील उपस्थित होते.
हे समुदाय भवन बेळगाव जिल्हा न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून झाली. न्यायालयीन परिसरात समुदाय भवन, प्रशासकीय इमारत आणि कॅन्टीनसारख्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेस गती येईल अशी अपेक्षा आहे.
न्यायमूर्ती हुद्दार यांनी यावेळी केलेल्या भाषणात तरुण वकिलांना न्यायालयीन प्रक्रियेचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले. “न्यायालयीन कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यातून शिक्षण मिळते, म्हणून रोज न्यायालयीन कार्यवाही लक्षपूर्वक अभ्यासली पाहिजे,” असे सांगत त्यांनी नव्या पिढीतील वकिलांना प्रोत्साहन दिले.
आमदार आसिफ सेठ यांनी या भावनासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. “न्यायालयीन परिसराचा विकास आणि वकिलांसाठी सुविधासंपन्न वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले. न्यायमूर्ती विजयकुमार पाटील यांनी या नवीन सुविधांचे कौतुक करत तरुण वकिलांना न्यायव्यवस्थेतील प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा यावर भर दिला.
कार्यक्रमात बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसण्णवर, न्यायाधीश हेमा लेखा, अभियंता एस.एस. सोबरद, यल्लप्पा दिवटे यांसह न्यायालयीन अधिकारी, वकील आणि इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
ह्या नवीन सुविधांमुळे बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि वकिली व्यावसायिकांना चांगले कार्यवातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.